Type Here to Get Search Results !

"वीज नसेल तर शेतकऱ्यांनी घरी थांबून काय करावे? म्हणून आता महावितरणच्या दारात मुक्काम ठोकणार" : संभाजीराव शिर्केंचा संताप, सोमवारपासून 'जागर आंदोलनाचा' इशारा

 

*मलकापूर, सुनिल संबारे:*  

"तालुक्यातील अनेक ठिकाणी महिनाभरापासून विजेच्या तारा चोरीला गेल्या आहेत. शेतातील विद्युत पुरवठा बंद आहे. आता शेतकऱ्यांची पाण्याची, कपाशी-तूर लावण्याची वेळ आहे. शेतकऱ्यांनी शेतजमीन तयार करून ठेवली आहे. पण महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कारभारामुळे अद्याप नवीन पोल उभारून, तारा टाकून विद्युत पुरवठा सुरू केलेला नाही. शेतात वीज नसेल तर शेतकऱ्यांनी घरी थांबून करायचे काय? म्हणून घरी थांबण्यापेक्षा वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयातच मुक्कामी राहून जागर आंदोलन करू, जेणेकरून झोपलेल्या वीज महामंडळाला जाग येईल," असा घणाघात किसान काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव शिर्के यांनी केला.

काल महावितरण कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी 'आंदोलन सम्राट' संभाजीराव शिर्के यांनी सोमवारपासून 'जागर आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे.

*महावितरणचा नाकर्तेपणा : शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर*  

वाघूळ शिवारातील खुपसे आणि कलकत्ता डीपीच्या तारा महिनाभरापूर्वी चोरीला गेल्या. तक्रारी देऊनही महावितरणने नवीन पोल, तारा बसवल्या नाहीत. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर पाणी देण्याचे संकट उभे राहिले आहे. "पगार घ्यायला अधिकाऱ्यांना एक तारीख चुकत नाही, पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला महिना लागतो," असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

*"शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी दिसत नाही का?" : बाळूभाऊ ठाकरेंचा महावितरणला सवाल*  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ ठाकरे यांनीही महावितरणच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. "शेतकऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून शेत तयार ठेवलं. बियाणं आणलं, खत आणलं. पण वीजच नसेल तर तो पेरणी कशी करणार? पोराबाळांचं पोट कसं भरणार? सावकाराचं कर्ज कसं फेडणार? अधिकाऱ्यांना एसीमध्ये बसून शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी दिसत नाही का? महिनाभरापासून शेतकरी अंधारात आहे, पण महावितरणला जाग नाही. आता गप्प बसणार नाही. शेतकऱ्याच्या घामाचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. सोमवारी कार्यालयाला टाळेच ठोकू," असा आक्रमक इशारा बाळूभाऊ ठाकरे यांनी दिला.

*संभाजीराव शिर्के : शेतकऱ्यांचा बुलंद आवाज*  

संभाजीराव शिर्के यांचे नाव म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पेटून उठणारा आवाज. याआधीही वीज कंपनी असो वा शासकीय कार्यालये, अन्याय झाला की त्यांनी दालनांना टाळे ठोकले आहेत. नुकसान भरपाई, पीक विमा यासाठी कृषी अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकून आंदोलने केली आहेत. "आज लोकशाही मार्गाने निवेदन दिले. उद्या हजारो शेतकरी घेऊन कार्यालयातच मुक्काम ठोकू. आमच्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात लागेल," असा इशारा संभाजी भाऊंनी 'रोखठोक महाराष्ट्र'शी बोलताना दिला.

*कोण होते उपस्थित?*  

या निवेदन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ ठाकरे, भगवान भाऊ खूपसे, सुरेश ठाकरे, रवींद्र खरचने, आनंद खुपसे, राहुल ठाकरे, विनोद हाडगे, बबलु देशमुख, ज्ञानेश्वर ठाकरे, सोहन देशमुख, राहुल नाफडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*प्रशासनाला शेवटची संधी*  

शेतकऱ्याने शेत तयार ठेवले, पण वीज नसल्याने पेरणी खोळंबली. आता शेतकऱ्यांनी घरात बसण्याऐवजी महावितरणच्या कार्यालयात मुक्काम ठोकायचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत जर विजपुरवठा सुरू झाला नाही, तर महावितरण कार्यालयच शेतकऱ्यांची 'युद्धभूमी' होईल. हे 'जागर आंदोलन' झोपलेल्या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय थांबणार नाही.

मलकापूर प्रतिनिधी..✍️

Post a Comment

0 Comments