Type Here to Get Search Results !

छत्रपतींच्या विचाराने पेटली ज्ञानज्योत : मराठा सेवा संघाचा 'सर्वधर्मीय गुणगौरव सोहळा' पुन्हा दिमाखात 18 पगड जातींना सोबत घेऊन समाजात समता व बंधुत्व रुजवणारा उपक्रम; 6 जूनला मलकापुरात भव्य सोहळा

 

मलकापूर, सुनिल संबारे:  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, मलकापूर यांच्यावतीने 'सर्वधर्मीय गुणगौरव सोहळा' दि. 6 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मराठा मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.

मागील वर्षीचा सुवर्ण इतिहास :  

21 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या या सोहळ्याला अफाट गर्दी उसळली होती. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीवर कृतिशील असणारा मराठा सेवा संघ कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे चित्र मागील वर्षी दिसून आले.

यावर्षीचा सोहळा - 18 पगड जातींचा संगम :  

सहा जून म्हणजे लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. याच पावन भूमीत 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांच्याच विचारावर मराठा सेवा संघाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. समाजात समानता आणि बंधुत्व निर्माण करून हा संघ यशाचा सुवर्ण इतिहास लिहितोय.

या सोहळ्यात इयत्ता 10 वी, 12 वी, स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रातील नवनियुक्त अधिकारी यांचा पालकांसह व शिक्षकांसह गुणगौरव सत्कार करण्यात येणार आहे. हा उपक्रम अनेक पिढ्यांना यशाची प्रेरणा देत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाचे मान्यवर :  

विशेष अतिथी : शिवश्री. श्रेणीक लोढा सर (अपर पोलीस अधीक्षक, खामगांव, IPS 2019)  

प्रमुख मार्गदर्शक : शिवश्री. अनिल आकाळ (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), शिवश्री. विकास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक), शिवश्री. प्रसाद पाटील (कार्यकारी अभियंता, सा.बां.वि. अकोला - आयर्न मॅन), शिवश्री. प्रदीप पाटील (DYSP, MPSC 2012)  

विशेष उपस्थिती : शिवश्री. रविंद्र चेंबे (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ)  

आयोजकांचे मनोगत :  

इंजिनीयर सचिन तायडे साहेब, जिल्हा सचिव, मराठा सेवा संघ :  

"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिवरायांच्या स्वराज्यातील न्याय व समता हाच आमचा आदर्श आहे. सर्वधर्मीय विद्यार्थी हाच उद्याचा महाराष्ट्र घडवेल."

शिवश्री योगेश दादा पाटील, प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड :  

"शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. गुणवंतांचा सन्मान म्हणजेच समाजाचा सन्मान आहे."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण मंत्र :  

"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होऊ शकत नाही. शिक्षण हीच खरी मुक्ती आहे, हे बाबासाहेबांचे विचार मराठा सेवा संघ प्रत्यक्ष कृतीतून राबवत आहे. दलित, वंचित, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

सर्व समाजबांधवांना जाहीर आवाहन :  

मराठा सेवा संघ मलकापूर परिवार यांनी सर्वधर्मीय समाजबांधवांना, पालकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टीप: कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, याची नोंद घ्यावी.  

स्थळ : छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मराठा मंगल कार्यालय, मलकापूर.

मलकापूर प्रतिनिधी..




Post a Comment

0 Comments