*मलकापूर, दि. 17* : तालुक्यातील *बेलाड* येथील वयोवृद्ध भूमिहीन दाम्पत्याच्या घरात मध्यरात्री घरफोडी होऊन अज्ञात चोरट्यांनी *1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज* चोरून नेल्याची घटना घडली आहे.
*गच्चीवर झोपलेले दाम्पत्य, बंद घरात चोरट्यांचा डाव*
फिर्यादी सुनंदाबाई विश्वास संबारे (वय 60) व त्यांचे पती विश्वास संबारे (वय 65) हे दोघेही भूमिहीन मजूर आहेत. दिनांक 16 मे रोजी रात्री उन्हाळ्यामुळे हे *वयोवृद्ध दाम्पत्य घराच्या गच्चीवर झोपले होते*. मध्यरात्री 1 ते 4 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
सकाळी 6 वाजता खाली उतरल्यावर घरातील *स्टीलच्या डब्यात ठेवलेले 8 ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत व 6 हजार रुपये रोख* चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. *₹15,000 प्रति ग्रॅम भावाने सोन्याची किंमत ₹1,20,000/- होते*. एकूण ₹1,26,000/- चा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
*"आयुष्यभराची पुंजी गेली, आता औषधपाण्याला पैसे नाहीत" - माऊलीच्या डोळ्यात अश्रू*
चोरी झालेल्या घराच्या स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या सुनंदाबाई माऊलीच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट दिसत होती. *"साहेब, ही सोन्याची पोत हीच आमची शेवटची पुंजी होती. म्हातारपणात आधार म्हणून ठेवली होती. औषधपाण्यासाठी ठेवलेले 6 हजार पण नेले. आम्ही दोघं वयोवृद्ध, भूमिहीन. आता पुढे कसं जगायचं?"* असा प्रश्न विचारताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
*"आमदार-जिल्हाधिकारी साहेबांनी मदत करावी" - दाम्पत्याची आर्त विनंती*
"आम्ही दोघं वृद्ध आहोत. मोलमजुरीही होत नाही. हे सोनं विकून दिवस काढायचे होते. *आमदार साहेब व जिल्हाधिकारी साहेबांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्हाला तातडीची आर्थिक मदत करावी*, हीच आमची कळकळीची विनंती आहे," असे सुनंदाबाई म्हणाल्या.
*सूतगिरणी फोडली, आता शेतातील तारा चोरीला : चोरीच्या घटनांमध्ये वाढ*
*काही दिवसांपूर्वीच बेलाड शिवारातील सूतगिरणीमध्ये मोठी घरफोडी* झाली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या *शेतातील विजेच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना* घडत आहेत. एकीकडे वयोवृद्धांच्या घरात घुसून त्यांची पुंजी लुटली जाते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. *पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून या चोरीच्या सत्रावर अंकुश लावावा व वयोवृद्ध दाम्पत्याला न्याय मिळवून द्यावा*, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मलकापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
*मलकापूर प्रतिनिधी...* ✍️

Post a Comment
0 Comments