Type Here to Get Search Results !

भ्रष्ट कारभाराचा फटका प्रवाशांना! धावत्या एसटीची चाके निखळली; मलकापूर आगाराच्या नियोजनावर शिवसेनेचा हल्लाबोल!


मलकापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगाराचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार काल प्रवाशांच्या जीवावर बेतला असता. हरणखेड ते मलकापूर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची मागील चाके धावत्या गाडीतून अचानक निखळल्याने मोठा थरार घडला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने आगारातील ड्युटी अलॉकेशन आणि देखभालीच्या नावाखाली सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

दिनांक २५ एप्रिल शनिवार रोजी भर दुपारी गाडी क्रमांक एमएच ४० वाय ५८५२ ही बस ड्युटी क्रमांक १३८ वर हरणखेड कडून मलकापूरकडे येत होती. यावेळी बसमध्ये प्रवासी असताना अचानक मागील टायरचा पूर्ण संच (Hub आणि Axle सह) बाहेर आला. बस एका बाजूला कलली, मात्र चालक एस. यु. जायभाय  यांनी अत्यंत शिताफीने गाडीवर नियंत्रण मिळवत ती थांबवली, ज्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना  मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आगार व्यवस्थापनाच्या भ्रष्ट धोरणांवर कडाडून टीका केली. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने मलकापूर आगारात ड्युटी अलॉकेशनमध्ये (कर्मचारी नियुक्ती आणि नियोजन) मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा पर्दाफाश केला होता. आजच्या या घटनेमुळे तो आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या अपघातामुळे एसटी प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आला असून, आता वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची आणि मलकापूर आगाराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगार व्यवस्थापनावर प्रश्नांची सरबत्ती.....

भंगार अवस्थेतील गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट मिळतेच कसे?

ड्युटी नियोजनात पारदर्शकता नसून केवळ ठराविक फायद्यासाठी फेरफार केले जातात का?

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राखीव असलेला निधी जातो कुठे?

"मलकापूर आगार व्यवस्थापक हे केवळ पैसे गोळा करण्यात आणि भ्रष्ट ड्युटी अलॉकेशनमध्ये व्यस्त आहेत का? असा प्रश्न आजच्या या घटनेवरून निर्माण होत आहे. ज्या गाड्यांची अवस्था भंगार झाली आहे, त्यांनाच रस्त्यावर का उतरवले जात आहे? प्रवाशांच्या जीवापेक्षा अधिकाऱ्यांना 'वरकमाई' महत्त्वाची वाटत आहे का?

शिवसेनेने आधीच या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आवाज उठवला होता. आजची ही घटना त्या दुर्लक्षाचाच परिणाम आहे. जर तातडीने सुधारणा झाली नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर शिवसेना स्टाइलने संपूर्ण 'मातृतीर्थ' बुलढाणा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. आम्ही प्रवाशांच्या जिवाशी खेळू देणार नाही."

— दिपक चांभारे पाटील,

शिवसेना, मलकापूर तालुकाप्रमुख

Post a Comment

0 Comments