मलकापूर घिर्णी भाग 2 या क्षेत्रात असलेली धनगर डीपी नूतनीकरण व्हावी यासाठी घिर्णी- बेलाड ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून चा संघर्ष सुरू आहे. अनेक वेळा विद्युत वितरण मलकापूर विभाग यांच्याकडे या संदर्भातल्या तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवून परिणामी आमरण उपोषण देखील करण्यात आलेले आहे. परंतु शासन प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर किंचितही गंभीर नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. तारीख 12 फेब्रुवारी 2024 शेकडोच्या संख्येत असलेल्या शेतकऱ्यांनी मलकापूर येथील विद्युत वितरण चे कार्यालय येथे आमरण उपोषणाचा तळ ठोकला होता. शेतकऱ्यांची नवीन किंबहुना नूतनीकरणाची डीपी संदर्भातली मागणी ही वाजवी असल्याकारणाने अनेक सामाजिक व शेतकरी संघटनांकडून शेतकऱ्यांच्या बाजूने वाढता पाठिंबा होता. पुढील काही महिन्यातच विधानसभा निवडणुका असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या या उपोषणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यावेळेसचे मलकापूर मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख जी संचेती यांनी शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन आठ दिवसात शेतकऱ्यांच्या नवीन डीपी संदर्भातला प्रश्न निकाली काढण्याबाबत लेखी व तोंडी स्वरूपाचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे उपोषण सोडवले होते. निश्चितच शासकीय प्रशासकीय कामांना थोडासा वेळ लागतो ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी आठ दिवसाचा दिलेला शब्द याचा तगादा लावून धरला नाही. या उलट माजी आमदार यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मतदान करून शेतकऱ्यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला होता. परंतु निवडून आल्यानंतर मलकापूर विधानसभेचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांना बहुदा शेतकऱ्यांचा विसर पडला असावा म्हणून आज पर्यंत दीड वर्ष उलटूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सन्माननीय आमदार गंभीर नाही..
त्यामुळे आज दिनांक 4 - 12- 2025 पासून पुन्हा एकदा मलकापूर येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे.

Post a Comment
0 Comments