मलकापूर, दि. 8 ऑक्टोबर 2025: नगर सेवा समिती, मलकापूरद्वारा संचालित आदर्श प्राथमिक विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या जोरावर गौरव महाराष्ट्राचा आदर्श शाळा पुरस्कार 2025 प्राप्त केला आहे. हा पुरस्कार पहाट फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येत असून, पुरस्कार वितरण समारंभ 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘आदर्श’ या नावातच दडलेली शाळेची प्रेरणा आणि नगर सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे विद्यालय मलकापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक चमकता तारा आहे. पूर्वी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असे. आजही इंग्रजी माध्यमाच्या प्रभावातून बाहेर पडत मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश देण्याची पालकांची पसंती ही आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेचे द्योतक आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण आणि सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्या अथक परिश्रमामुळे शाळा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अव्वल ठरली आहे. आदर्श प्राथमिक विद्यालय दरवर्षी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. यामध्ये चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, गायन, नृत्य, क्रीडा, निबंध, आणि विज्ञान प्रदर्शनासारख्या स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय, MTS, मथन करा. I am Winner, आनंद स्कॉलर, आणि स्कॉलरशिप अशा विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते. शाळेत नियमित पालक सभा, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी, जयंती-उत्सव साजरे करणे, तसेच स्त्री सशक्तीकरण, व्यसनमुक्त भारत, साक्षर भारत, आणि मराठी भाषा संवर्धनासारख्या जनजागृतीपर उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते.
पहाट फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार शाळेच्या सर्वांगीण योगदानाचे प्रतीक आहे. पुरस्कार समारंभात उद्घाटक म्हणून मा. लाठकर मॅडम जिल्हा शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून मा. श्वेता परदेशी, सेलिब्रिटी ज्यूरी मिसेस इंडिया सेलिब्रिटी, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील. या पुरस्कारामुळे आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण, सर्व शिक्षक-शिक्षिका, आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विशेषतः शाळेच्या शिक्षिका कु. स्मिता कोलते यांनी “पहाट गौरव महाराष्ट्राचा” कार्यक्रमात सादर केलेल्या उत्कृष्ट प्रस्तुतीमुळे शाळेची ख्याती आणखी वाढली आहे. या यशासाठी आदर्श प्राथमिक विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Post a Comment
0 Comments