*बेलाड, ता. मलकापूर:* 'जनसेवा क्लिनिक'च्या माध्यमातून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. हनुमान मुरलीधर भगत हे केवळ डॉक्टर नसून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी नाव बनले आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या 8 मतांनी पराभूत झालेले डॉ. भगत सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आले आहेत.
*वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक लढा*
बेलाड येथील रहिवासी असलेले डॉ. भगत गेल्या अनेक वर्षांपासून 'जनसेवा क्लिनिक'च्या माध्यमातून बेलाडसह पंचक्रोशीतील गावांमध्ये अल्पदरात आरोग्य सेवा पुरवत आहेत. रुग्णसेवेसोबतच त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत.
*उपोषण ते घेराव: आंदोलनांची मालिका*
1. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात दोन दिवसीय लाक्षणिक आमरण उपोषण.
2. धनगर डीपी बसविण्याच्या मागणीसाठी चार दिवसांचे आमरण उपोषण.
3. बेलाड येथील डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात जनआंदोलन.
4. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर MSEB कार्यालयावर घेराव आंदोलन.
5. कल्याण इन्फ्रास्ट्रक्चरच्या अवैध उत्खननाविरोधात निषेध नोंदवून काम बंद करायला लावले.
याशिवाय, गावातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे, कंत्राटदारांना दर्जेदार कामाची तंबी देणे, अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी काम केले आहे.
*"सेटलमेंट हा शब्द डिक्शनरीत नाही" - कार्यकर्ते*
डॉ. भगत यांच्या निकटवर्तीयांच्या मते, ते कोणत्याही परिस्थितीत तडजोड स्वीकारत नाहीत. "शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते प्रखर भूमिका घेतात आणि आंदोलन यशस्वी होईपर्यंत माघार घेत नाहीत," असे एका कार्यकर्त्याने सांगितले.
*युवक व शिक्षणासाठी पुढाकार*
युवकांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱ्या डॉ. भगत यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेसाठी स्वखर्चाने वायफाय कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर त्यांची निष्ठा असल्याचे सांगितले जाते. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
*"विचारधारा महत्वाची" - जाणकार*
"डॉ. हनुमान भगत हे केवळ एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे. सर्वधर्मसमभाव व समानता या तत्त्वांवर त्यांचा विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया गावातील जाणकार नागरिक व्यक्त करतात.
विशेष म्हणजे, स्वतःच्या घरी शेती नसतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी दाखवलेली तळमळ पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. प्रखर वक्तृत्वशैली, दांडगा जनसंपर्क आणि राजकीय अभ्यास यामुळे आगामी राजकारणात डॉ. भगत यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
*- प्रतिनिधी, बेलाड*


Post a Comment
0 Comments